मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

Foto
 सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची ४ प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. माढा येथे आयोजित सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला थेट इशारा दिला. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.

दुपारी ३ वाजता होणारी माढ्यातील सभा जरांगे पाटील यांच्या व्यस्त दौर्‍यामुळे रात्री उशिरा साडेअकरा वाजता पार पडली. माढ्यात आगमन होताच समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर झालेल्या सुमारे तासाभराच्या भाषणात जरांगे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

आता मी कोणाला सोडणार नाही
माढ्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे म्हणाले की, एक वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणार्‍या कोणालाही हा समाज माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले. 

 यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही
माढ्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना ५८ लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असा थेट आरोपही जरांगे यांनी केला.